कृषी पर्यटन

कृषी पर्यटन - ग्रामीण जीवनातील आत्मसन्मान व उन्नतीचा मार्ग.

सभोवताली डोळसपणे नजर फिरवली असता लक्षात येते की जगभर पर्यटन व्यवसाय नवनव्या वाटा चोखंदळताना दिसतो आहे. बदललेल्या पर्यटनाच्या संकल्पनांमध्ये जंगलभ्रमण, पक्षीनिरीक्षण, जलक्रीडा, अभयारण्य, साहसी पर्यटन, आरोग्यपर्यटन, या सर्वांबरोबर फळत्या फुलत्या शेतावरील आनंददायी शिक्षण व मौज यांचा सुंदर मिलाफ असलेले कृषी पर्यटनही येते.

कृषी पर्यटन हा शब्द आता सर्व परिचित झालेला आहे. कित्येकांनी आपापल्या शेतावर कृषी पर्यटन केंद्र चालू केलीही असतील. पाहुण्यांनी सातत्याने आपल्या केंद्रावर येऊन, आनंदीत होऊन, त्याची प्रशंसा करावी अशी रास्त अपेक्षा यजमान शेतकऱ्याने ठेवायला पाहिजे.

पाहुण्यांनी भेटी देण्याचा आलेख चढता ठेवण्यासाठी कृषी पर्यटन केंद्रावर सकारात्मकताही वाढत्या श्रेणीत असायला हवी. सर्वांना हवेहवेसे वाटणारे वातावरण कसे रुजवायचे व अंगी बाणवायचे या तत्वांची आपल्या पुर्वजांनी चिरकाल टिकणाऱ्या सूत्रात मांडणी करून ठेवली आहे. “ सत्यं शिवम् सुंदरम् ” शेतकऱ्याने ह्या मूल्याची कास धरली तर अन्ननिर्मिती साधतानाच परिसराचे सौंदर्य खुलते. शेतीमध्ये स्वच्छता व नीटनीटकेपणा यासाठी पराकष्ठाचे प्रयत्न झाले पाहिजेत. जमिनीच्या उंच सखलपणामुळे एकसंध नसलेले पिक, तणांनी व काटेरी झुडूपांनी भरलेले बांध, पूर्ण दुर्लक्षित बंदिस्ती, अशुद्ध बियाण्यामुळे पिकात दिसणारी खेड व या सर्वांमुळे अतिशय कमकुवत प्रगट होणारी उत्पादकता हे शेतीचे नकारात्मक रूप झाले. अशा केंद्रावर दिले जाणारे जेवण व इतर खाद्यपदार्थ कितीही रुचकर व वैविध्यपूर्ण असतील तरीही त्याचा समाजात चांगला बोलबाला होणार नाही.

उत्तम मशागत केलेली शेते, आखीव रेखीव पद्धतीने (SRT) केलेली पिकांची लागवड, फुलोऱ्यावर आलेली पिके, फळांनी लगडलेली झाडे, साठवणूक केलेले खळे, तणविरहित स्वच्छ बंदिस्ती हे शेतीचे सकारात्मक चित्र झाले. अशा शेतावर सुयोग्य नियोजन व विज्ञान तंत्रज्ञानाच्या मिलाफाने “सौंदर्य-उत्पादकता व आनंद” प्रगटलेले दिसते. शेतावर दिवसभर ट्रीपसाठी आलेल्या मंडळींना ह्या आदर्श शेती, पाहुणचार व स्थानिक रुचकर अन्नपदार्थांचे तोंडभारु कौतुक आसपास तसेच इंटरनेटवर केल्याशिवाय राहवत नाही. मग ह्या संदर्भाने येणाऱ्या पाहुण्यांची वर्दळ वाढत जाते.

कृषी पर्यटनातील यशासाठी सुबक नेटकी व उत्पादक शेती असणे अत्यावश्यक आहे. तसेच यजमान शेतकऱ्याची सुयोग्य मानसिकताही संपूर्ण यश प्राप्तीसाठी गरजेची दुसरी बाजू आहे. अनोळखी, अपरिचित लोकांच्या समाधानासाठी सुट्टीच्या दिवसात मनःपूर्वक कष्ट घेण्याची प्रवृत्ती व ‘ अतिथी देवो भव ’ या उक्तीचे कृतीत पर्यवसन करण्याची आवड यजमानाच्या संपूर्ण कुटुंबाला असायला हवी. आपल्या केंद्रावर पाहुणे आल्याबरोबर ‘ नमस्काराने स्वागत करून त्यांच्याबरोबर आपल्याला अवगत असणाऱ्या भाषेत आत्मविश्वासापुर्वक संवाद साधावा. दिवसाच्या नियोजनाविषयी उत्साहाने त्यांना माहिती द्यावी. आपल्या शेतीप्रकल्प, फळझाडे, पिके, जमीन, पाणी, पक्षी, नद्या, डोंगर, व परिसर इ. विषयी उत्साहाने माहिती सांगावी. त्यात बिलकुल टाळाटाळ अथवा चालढकल करू नये कारण यावेळेसच यजमानाचा आत्मसन्मान उंचावण्याची संधी असते.

पर्यटकांना सहभागी होता येईल अशा विविध अॅक्टीव्हीटीझ केंद्रावर जरूर निर्माण कराव्यात. लहानग्यांसाठी झोपाळे, घसरगुंडी सोबत ससे, गीज्-बदके, रंगीत मासे इ. ठेवले तर ते तेथे छान रमतात. मोठ्यांसाठी रायफल शूटिंग, आर्चरी, पोहणे, कयाकिंग, बोटिंग, बैलगाडी, सायकल इ. ठेवल्याने त्यांचा वेळ मजेत जातो. आलेल्या बालगोपाळ मंडळींनाही रुचेल असा जेवणाचा बेत असावा. नाश्ता व जेवणाच्या वेळा पाळणे हे पर्यटन यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे अंग आहे.

यजमान शेतकऱ्यांचा पेहराव हा स्वच्छ व टापटीप असावा. पानपराग, सागर-गोवा-कोल्हापुरी-हनिमून इ. गुटख्याचे प्रकार, मशेरी वा तंबाखू सारख्या भडक वासांच्या डोक्यात तिडीक जाणाऱ्या पदार्थांचा वापर टाळावा. खाकारणे, ढेकरा देणे, दात कोरणे, कान साफ करणे, नखे खाणे, नाकात बोटे घालणे, नको तिथे खाजवणे, इ. वाईट सवयी बिलकुल असता कामा नयेत. पाहुण्यांच्या फार जवळ जाऊन बोलणे, दाढी वाढविणे, छातीवरची बटणे उघडी टाकणे, गळ्यात रुमाल बांधणे, मोठ मोठ्याने बोलणे, अर्वाच्य शब्दात आपल्या सहकाऱ्याला दटावणे, वाढपाच्या भांड्यातील अन्न खाणे, रस्त्याच्या मध्यभागी गाडी पार्क करून बोलत बसणे, इ. प्रकारची बेदरकारी वृत्ती खेड्यांमध्ये सर्रास आढळते. ही वृत्ती ह्या व्यवसायला नक्कीच मारक आहे. प्रगती साधायची असेल तर अशा सवयींमध्ये बदल करून घेणे जमते. सदा हसतमुख पारदर्शी स्वभाव व दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती असलेल्या यजमानाच्या शेतात पर्यटनासाठी जाण्यास पाहूणे प्रथम पसंती देतात.

कृषी पर्यटनासाठी यशस्वी होण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीची नितांत गरज असते. या गोष्टीचे कायम स्मरण असावे. आपल्या कर्मचाऱ्यांना आमचे ‘ विस्तारित कुटुंब ’ ह्या नात्यात गुंफले तर छान एकोप्याचे वातावरण बनून ‘ पाहुण्यांची ख़ुशी ’ हे मधुर फळ सांघिक प्रयत्नांनी प्राप्त होते.

कृषी पर्यटन केंद्र यशस्वीपणे चालविताना अनेक अडचणीही येतातच. पिकनिकला जाणे म्हणजे दारू पिण्याचा मनमुराद आनंद लुटणे ही समाजाच्या सर्व स्तरांमध्ये बस्तान ठोकून असणारी कल्पना. “ तुम्ही फक्त ग्लास द्या, आम्ही बंद खोलीत घेऊ, त्रास बिलकुल देणार नाही ” ह्या पाहुण्यांच्या विनंतीला यजमानाने बिलकुल प्रतिसाद देऊ नये. उलट दारू पिण्याला आपल्या केंद्रात प्रतिबंध केला पाहिजे. नाहीतर अपघात व अडचणींचा डोंगर वाढत जातो व “करायला गेलो एक”. अशी परिस्थिती अंगावर बेतते. उचलेगिरी, पाहुण्यांच्या उर्मटपणा, परिसरातील टवाळ टाळकी, अपघात, अचानक येणारे पाहुणे, टारगटांचा पाहुण्यांना उपद्रव, इ. बाबतीत अत्यंत दुरदर्शीपणे सतर्क राहून शांत चित्ताने, सहकाऱ्यांशी विचारविनीमय करून आत्मविश्वासपूर्वक अधिकाराने मार्ग काढणे आवश्यक ठरते.

परदेशाप्रमाणे आपल्याकडेही ५ दिवसांचा आठवडा ही कल्पना रुजू लागली आहे. मुले, घरातील वयस्क आई वडील ह्या सर्वांसह कुठेतरी सहलीसाठी जावे अशी इच्छा तर कर्त्या शहरवासीयाच्या मनात फार असते. मुलांना खेळण्यासाठी अंगण नाही, मैदान नाही, बागा नाहीत त्यांमुळे एखाद्या मॉलमध्ये वेळ काढणे किंवा पिझ्झा अथवा बर्गर वा इतरत्र गंमत म्हणून खवय्येगिरी करणे एवढेच पर्याय शिल्लक राहतात. इतके करूनही मुलांना बाहेर कुठे नेले नाही ही रुखरुख मनात राहतेच. ह्या मंडळीकडे मौजेखातर खर्च करण्यासठी पैसाही उपलब्ध असतो. अशावेळी शहरांपासून दोन तासांच्या अंतरावर असणारे शेतीप्रकल्प हे उत्तम पर्यटन केंद्र बनू शकतात.

शहरातील प्रदूषणाचा, सिमेंट कॉक्रीटच्या जंगलाचा, गाड्यांचा सुळसुळाट असलेल्या रस्त्यांचा, खचाखच गर्दीचा, रोजच्या धकाधकीच्या प्रवासाचा अशा साचेबद्ध जीवनातून थोडी सवड काढून जवळपासच्या मोकळ्या वातावरणात जेथे स्वच्छ पाणी, साधे पण रुचकर जेवण व चांगल्या टॉयलेट्सची सोय व सुरक्षतेची हमी असणाऱ्या ठिकाणी जाण्यासाठी शहरवासी उत्सुक आहे. अशी संधी चतुराईने आत्ताच्या नेमक्या वेळी साधून नेटकी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन केंद्र सुरु करणे हे चाणाक्षपणाचे ठरेल.

स्वित्झर्लंड हा पर्यटकांसाठी स्वर्ग मानला जातो. तेथील अनुपमेय निसर्ग सौंदर्य, त्या सरकारने स्थानिकांच्या सहाय्याने हिऱ्याला कोंदण करावे तसे जपले आहे, सांभाळून वाढविले आहे व सर्वांच्या आनंदासाठी उपलब्धही केले आहे.

आपला देशही पर्यटनात प्रथम क्रमांकावर येणे शक्य आहे. सक्षम तरुण वर्ग हळू हळू शेतीकडे वळतानाचे आशादायक चित्र आता दिसू लागले आहे. योग्य तंत्राचा (SRT) वापर करून ह्या सूर्यप्रकाशाच्या देशात आदर्श शेती प्रकल्प उभे राहणे सहज शक्य आहे. ‘शून्य मशागत’ किंवा ‘तण देई धन’ ह्यावर सहज विश्वास बसत नाही परंतु ही तंत्र अत्यंत कसदार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक खेडे कृषी पर्यटनाचा उत्कृष्ट अविष्कार करू शकते हे अविश्वसनीय वाटले तरी संपूर्ण सत्य आहे. गरज आहे स्वःताच्या क्षमतेचा वापर करून परिवर्तनातून प्रगती गाठायची. कृषी पर्यटन केंद्राची स्थापना खेडोपाडी झाल्यास रस्ते, पाणी, वीज, वाहतूक, आरोग्य, कचरा व्यवस्थापन इ. दुर्मिळ व्यवस्था उत्तम स्थितीत मिळण्याची गरज निर्माण होईल. पर्यटनातून मिळणाऱ्या आर्थिक लाभ व प्रतिष्ठेमुळे सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढेल.

मित्रांनो, कृषी पर्यटनाच्या माध्यमातून स्वतःची प्रगती साधत असतानाच सशक्त, सुदृढ, सक्षम व आनंदी भारताचे स्वप्न साकार करूया !


  श्री. चंद्रशेखर भडसावळे