जलपर्णीच्या उच्छादापासून मुक्ती ?

जलपर्णीच्या उच्छादापासून मुक्ती ? - उल्हास नदीवरील प्रयोग यशस्वी.

जलपर्णी... नदीवर पसरणारी आणि तिच्यातील जैवविविधतेचा जीव घेणारी. उन्हाळ्यात तर तिचा उच्छाद कमालीचा वाढतो. तिच्या उच्चाटनाचे अनेक उपाय झाले, पण फार फरक पडला नाही. मात्र, अलीकडेच उल्हास नदीत यशस्वी झालेल्या एका प्रयोगामुळे या समस्येपासून मुक्ती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या प्रयोगाबाबत..

पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, नाले, तलाव, सरोवरे फार छान दिसतात. त्यातच कधी पूर येतो व पाण्याची सरमिसळ होते. पावसाने काढता पाय घेतला आणि हवामान उष्ण व्हायला लागले की जलसाठ्यातील पाणी कमी होत जाते. नीट निरीक्षण केले तर डिसेंबरच्या सुमारास आसपासच्या जलाशयांमध्ये कुठेतरी कोपऱ्यात लहानसा हिरवा पुंजका तरंगताना दिसतो. महिन्याभरात पाण्यावर पसरलेला गच्च, गर्द हिरवा गालिचा पाहून धक्का बसून थक्क व्हायला होते. एवढ्या झपाट्याने वाढणारी ही काय वनस्पती असावी? ही आहे जलपर्णी. जलपर्णीचे इंग्रजी नाव आहे थरींशी हूरलळपींह. त्याचे शास्त्रीय नाव आहे, Eichornia Crassipes.

लहान मोठ्या जलाशयांवर दाट हिरवे जाजम पसरल्यासारखी किंवा उत्तम खत पाणी दिलेले शेत असावे, अशी वाटणारी ही तरंगणारी जलपर्णी. प्रथमदर्शनी फार छान दिसते. गर्द हिरवी, चकचकित गोलसर तुकतुकीत पाने, मध्यभागी उंच पुष्प दंडावर दिमाखाने मिरवणारी, पिवळा ठिपका ल्यालेली निळी फुले असतात. जलपर्णीचे हे रूप पाहून खूप लोकांना असे वाटते की जलपर्णी जलाशयाचे प्रदूषित पाणी स्वच्छ करण्यासाठी आली आहे. या वनस्पतीचे विविध फायदे कसे करून घेता येतील यासाठी याचे संवर्धन करावे की काय असा विचार मांडतात. परंतु प्रत्यक्षात मात्र ही जलपर्णी मूळ जलसाठ्यालाच ठार करण्याची क्षमता बाळगते. म्हणून जगभर ही वनस्पती किलर विड म्हणून प्रसिद्ध आहे.

रामायणातील कथेमधील अहिरावण महिरावण राक्षसांप्रमाणे, स्वतःच्या रक्ताच्या थेंबाथेंबा _पासून पुन्हा पुन्हा उत्पन्न होणाऱ्या, जलपर्णी वनस्पती तिच्या प्रत्येक तुकड्यापासून नवीन कार्पेट निर्माण करते. दोन आठवड्यात दुप्पट ह्या प्रचंड गतीने तिची वाढ होते. मूळ झुडपामधून चारही बाजूला येणाऱ्या

देठांमधून (श्रेप) एकापासून अनेक पुंजके चक्रवाढ व्याजाप्रमाणे केंव्हा तयार होतात हे कळतच नाही आणि बोल बोल म्हणता पाण्याचा संपूर्ण पृष्ठभाग जलपर्णीच्या अतिक्रमणाने झाकला जातो.

उपद्रव मूल्य
  • जलपृष्ठावरील जलपर्णीच्या गच्च गालिच्यामुळे सूर्यप्रकाश पाण्यामध्ये पोहचत नाही. सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे सकारात्मक जीवसृष्टीचा उगम थांबून नकारात्मक गोष्टींचा उदय होतो.
  • वाऱ्याच्या मदतीने पाण्याच्या पृष्ठभागावर प्राणवायू विरघळणे थांबते. तसेच पाण्याचा प्रवाह खुंटल्यामुळे सुद्धा विरघळेला प्राणवायू संपूर्ण जलसाठ्यामध्ये मिसळणे थांबते. एकंदरीतच जलाशयामधील प्राणवायूचे प्रमाण झपाट्याने संपून ऑक्सिजन विरहित परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पाण्यातील माश्यांना प्राणवायू घेण्यासाठी पृष्ठभागावर तोंडे बाहेर काढून प्राणवायूसाठी झटावे लागते. जलपर्णीमधे नेहमीच मासे मेलेले आढळतात.
  • इतर जलचर जसे कासवे, बेडूक, पाणसाप अशा सर्वच प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येते. तसेच त्या जलसाठ्यांनावर अवलंबून असणारे खंड्या पक्षी, पाणकावळे, पाणकोंबडी, बदके, मासे पकडणारा गरुड, इत्यादींची अन्नसाखळी तुटते.
  • निरनिराळ्या जातींच्या डासांची उत्तम पैदास होते व शेजारील लोकवस्तींमध्ये त्याच्या झुंडी हल्ला करतात.
  • पाणी रोगट होते तसेच मोठ्या प्रमाणातील जलपर्णीच्या बाष्पोत्सर्जन प्रक्रियेत पाणी संपते.
  • शहरी वस्तीमधून जलसाठ्यांमध्ये येणाऱ्या प्रदूषित पाण्यावर गोजिरवाणे पांघरूण घालायचे काम जलपर्णी करते.
जलपर्णीमुळे स्थानिकाची परवड

जलपर्णीच्या घट्ट, जाड गालिच्यामुळे तेथील जलसाठ्याच्या बाजूला राहणाऱ्या स्थानिकांना कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते हे समजून घेणे फारच महत्वाचे आहे. आमच्या टीमने केलेल्या पाहणीमध्ये स्थानिकांनी सांगितलेल्या अनुभवाने अंगावर काटा आला. त्यांनी सांगितले, 'मार्च - एप्रिल मध्ये घराबाहेर राहून बोलणे सुद्धा अशक्य आहे, कारण बोलण्यासाठी तोंड उघडल्यास डास तोंडात जातात. दुर्गंधी व गलिच्छ दृश्य हा आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. आम्ही आता आशाच सोडली आहे की नदी, सरोवरे हे आता पुन्हा कधीतरी स्वच्छ व निर्मळ होतील.

ठिकठिकाणचे यशस्वी प्रयोग

ह्या जलपर्णी समस्येचा सखोल अभ्यास प्रयोगशील शास्त्रज्ञ शेतकरी श्री. चंद्रशेखर भडसावळे यांच्या सगुणा रुरल फाउंडेशनच्या (एसआरएफ) टीमने केला व त्यावर सगुणा जलसंवर्धन तंत्र हा उपायही शोधला. २०१८ साली सगुणा बागेच्या कमळ तलावामध्ये जलकुंभीने आक्रमण करून संपूर्ण तलाव झाकून टाकला होता. येथील नाविन्यपूर्ण शून्य मशागत तंत्रामध्ये वापरण्यात येणारे 'ग्लायफोसेट' नावाचे तणनाशक अचूक पद्धतीने वापरून जलकुंभी नष्ट करण्याचा प्रयोग केला. ग्लायफोसेट फक्त पानांमधून वनस्पतीच्या शरीरामध्ये प्रवेश करते, या शास्त्रीय तत्वाचा आधार घेऊन कमळाची पाने पाण्याच्या पृष्ठभागाखाली कापून घेतली व जलकुंभीवर तणनाशक फवारले. जलकुंभी १५ दिवसांतच पूर्ण नष्ट होऊन कमळाची कोवळी पाने पाण्यावर नव्या जोमाने तरंगू लागली. एक महिन्यानंतर विपुल सुंदर फुले व त्यापाठोपाठ मधमाश्यांच्या ३ जाती आणि कमळपक्ष्यांची जोडी तेथे दिसून आली.

औरंगाबाद येथील प्रसिद्ध डॉ. सलीम अली सरोवराला जलपर्णीने विळखा घातला होता. ह्या एकेकाळी जैव विविधतेने नटलेल्या चाळीस एकर तलावाला जलपर्णी मुक्त करण्याची किमया शासनाच्या व स्थनिकांच्या मदतीने, सगुणा जलसंवर्धन तंत्राने करून दाखवली. २०१९ साली केलेल्या या कामामुळे आजतागायत हा तलाव जलपर्णी मुक्त आहे. तेथील मासे व पक्षी यामध्ये प्रकर्षाने वाढ झाल्याचे तेथील पक्षीप्रेमी सांगत आहेत. कर्जत तालुक्यातील उकरूळ गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या गावातील तलाव साफ करण्यासाठी सगुणा जलसंवर्धन तंत्राची डिसेंबर २०१९ साली मदत घेतली आणि आजतागायत हा तलाव स्वच्छ व सुंदर स्थितीत आहे.

या शास्त्राधारित तंत्राच्या यशस्वी अनुभवानंतर ठाण्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी उल्हास नदीच्या ३० किलोमीटरमधील कित्येक वर्षे अनुत्तरित राहिलेला जलपर्णीचा हा जटिल प्रश्न सोडवण्याचा चंग बांधला. एसआरएफ टीमने सादरीकरण, चर्चा, प्रश्नोत्तरे, बैठका अधिकाऱ्यांसोबत केल्या. अर्थात, ग्लायफोसेट तणनाशकाला विरोध झालाच. त्यासाठी उल्हास नदीच्या एका कोपऱ्यामध्ये प्राथमिक चाचण्या करण्यात आल्या. सतत ५ दिवस (फवारणीपूर्व व फवारणी नंतर ) पाण्याचे नमुने घेऊन ते नामांकित प्रयोगशाळेत तपासण्यात आले. आणि त्यानंतर तांत्रिक बाबींची पूर्तता केली. एप्रिल २०१९ मध्ये उल्हास नदीवर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यावेळी असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आमचे सहा सहकारी आजरी होऊन टीमचे मनोबल ढासळले. २२ दिवसांनी धोका टळल्याचे लक्षात आल्यावर ड्रोन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन काम पूर्णत्वाला नेले. १५ दिवसांतच जलपर्णीच्या विळख्यातून उल्हास नदी पुन्हा स्वच्छ व सुंदर होताना दिसू लागली. जगभरच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे यांत्रिक पद्धतीने जलपर्णी काढल्यावर ५-६ महिन्यांतच जलपर्णीचे आक्रमण पुन्हा दिसते.

एवढ्या विस्तीर्ण किनाऱ्यामध्ये खाचाखोच्यांमध्ये काही जलपर्णी शिल्लक राहून पुन्हा वाढणार याची आम्हाला अगोदरच कल्पना होती. त्याचा बिमोड पावसाळ्यानंतर नोव्हेंबर - डिसेंबर मध्ये केला. नदीच्या दोन्ही तिराच्या ६० किलोमीटर परिसरातील शेकडो गावकरी यावर्षीच्या सद्य परिस्थितीबाबत आनंदी आहेत. शेकडो स्थानिक मच्छिमार नदीमध्ये आता मासेमारी करताना दिसत आहेत. सुंदर नितळ पाण्यावर निरनिराळे स्थलांतरित पक्षी आलेले दिसत आहेत.

...तरीही 'ग्लायफोसेट'ला विरोध का ?

ग्लायफोसेट हे आपल्या रोजच्या वापरातल्या सारख्या अनेक रसायनांप्रमाणे एक रसायन आहे. कोणत्याही रसायनाच्या वापराचे प्रमाण (dose) हे फारच महत्वाचे ठरते. ग्लायफोसेटचा जितक्या प्रमाणात वापर केला जातो, ते पाहता हे रसायन मानव व इतर प्राणी जगतासाठी निश्चितपणे हानिकारक नाही, असे FAO, WHO, EFS-, EChA, USDA, EPA इत्यादी जागतिक संघटनानी जाहीर केलेले आहे. आपल्या अन्नपदार्थांमध्ये रोजच्या रोज वापरत असलेले मीठ (NaCl) हे ग्लायफोसेटपेक्षा दुप्पट हानिकारक आहे, असे जागतिक कॅन्सर संशोधन संस्थेचे (IARC) म्हणणे आहे. जिज्ञासूंनी याबाबत पुढील लिंकवरील व्हिडिओ जरूर पाहावा : https://youtu.be/4htntdHpXL0

परंतु, या रसायनाच्या परिणामकतेमुळे मोठ्या प्रमाणात हिरवी वनस्पती प्रभावीपणे मरते ही कल्पना माणसाच्या मनाला धक्का देणारी आहे. रसायन म्हणजे काहीतरी वाईटच ही भावना आम समाजामध्ये अजाणतेपणे पसरवली गेली आहे. तसेच रसायनांविषयी मानवी मनामध्ये बसलेली भीती इतकी घट्ट असते कि आपण नव्याने सारासार विचार करणे सोडून देतो. परंतु, आज मानव जात जगवण्याच्या दृष्टीने जमिनीची धूप, शेतकऱ्याचा आत्मविश्वास, उजाड वने व डोंगर, इत्यादी हे आज तातडीने हाताळायचे विषयांचे दृष्टीने ग्लायफोसेट हे अत्यंत प्रभावी, सोपे व सुरक्षित असे अवजार आहे.

ग्लायफोसेट विषयी वैज्ञानिक माहिती व प्रयोग

ग्लायफोसेट १६० देशामध्ये शेती, फळबागा व पर्यावरण या क्षेत्रात फार लोकप्रिय तणनाशक आहे व ते प्रभावीपणे मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. त्याची फवारणी केल्यावर ते फक्त पानांवाटे वनस्पतीच्या मुळांपर्यंत पोहचते व वनस्पतीमधील प्रकाशसंस्लेषण संलग्न एन्झाइम्सचे (enzymes ) रस्ते बंद करते व त्यामुळे वनस्पती मरायला सुरुवात होते. ही एन्झाइम्स मानव व प्राणी यांच्या शरीरात नसतात. त्यामुळे त्याचा कोणताही दृश्य परिणाम मानवाच्या किंवा प्राण्यांच्या शरीरावर होत नाही. बऱ्याच जणांना वाटते रसायन फवारले म्हणजे जैवविविधता धोक्यात येईल. म्हणून यासाठी याचा प्रयोग सगुणा बागेत घेण्यात आला. माशाच्या टँकमध्ये नदीमधील स्थानिक मासे व शेततळ्यातील मासे सोडले. त्यावर जलपर्णीची रोपे ठेवली. त्यावर दुप्पट ग्लायफोसेट फवारण्यात आले. त्यासाठी लागलेले ग्लायफोसेट चे द्रावण (५० मिली) रोज त्या टॅन्कमध्ये ओतण्यात आले. जलपर्णी १० दिवसांत मेली परंतु माश्यांवर कोणताही वाईट परिणाम झालेला दिसला नाही. त्यानंतर प्रति १५ दिवसांनी टँकमधील ३ मासे, पाणी व मेलेली जलपर्णी यांचे नमुने घेऊन ते प्रयोशाळेत ग्लायफोसेटच्या शिल्लक अवशेषासाठी तपासण्यात आले. त्यामध्ये अतिसूक्ष्म प्रमाणात सुद्धा हे रसायन आढळले नाही. प्रयोग पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून संबंधित व्हिडिओ पाहावा. लिंक : https://youtu. be/XDE3pfaGNU

यासाठी वापरले जाणारे तंत्र कमी खर्चात, कमी वेळात अत्यंत प्रभावी ठरले आहे. ठिकठिकाणच्या नद्या, तलाव इ., डठक टीम, शासन, व स्थानिक संवेदनशील जागरूक नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांनी जलपर्णी मुक्त करणे शक्य आहे.


  प्रा. अनुराधा चंद्रशेखर भडसावळे । श्री. अनिल निवळकर