वणवे : समस्या आणि उपाय

डोंगर, जंगल किंवा ओसाड गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा मानवी कारणांमुळे लागलेली/लावलेली अनियंत्रित आग म्हणजे वणवा होय. नोव्हेंबर ते मे दरम्यान मोटारगाडी किंवा एस.टी बस मधून प्रवास करताना हमखास ठिकठिकाणी डोंगर वणव्याने पेटलेले, काळे झालेले बघायला मिळतात. आमच्या अनुभवानुसार पाऊस पडेपर्यंत वणवा लागू शकतो. वणवा एकदा का पेटला की तो संपूर्ण प्रदेश/ जंगल/डोंगर भस्मसात करून टाकतो. सुरुवातीला छोटीशी असलेली ठिणगी वाऱ्यामुळे विशाल रूप धारण करते. कधी तर या आगीचे रूप खूप भयानक असते आणि आग आटोक्यात आणताना स्थानिक रहिवासी व वन विभागाची दमछाक उडते. आपल्या देशात ९५ टक्के वणवा हा मानवाच्या हलगर्जीपणा आणि चुकीच्या वृत्तीमुळे लागतो.

महाराष्ट्रासह देशभरात विविध विकृत मानसिकतेपोटी लागणारे, लावले जाणारे वणवे आज पर्यावरणासमोरील प्रचंड मोठी समस्या बनून राहिली आहे. या वणव्यामुळे सर्वदूर जंगलातील जैवविविधता, वन्यजीव, कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी इत्यादी नष्ट होतात. विशेष औषधी वनस्पतीही नामशेष झाल्या आहेत.

वणवा लागण्याची कारणे :
1. मानवनिर्मित कारणे -
  • मद्यनिर्मिती साठी मोहाची फुले वेचताना जमिनीवर पडलेल्या पानांचा त्रास होतो म्हणून त्याला आग लावली जाते.
  • गवत पेटवले तर नवीन गवत चांगले येईल, असा गैरसमज गुराख्यांमध्ये आहे. त्याकरिता ते गवत पेटवून देतात.
  • जंगलालगत शेती असेल तर तेथेही जमीन साफ केली जाते. त्यासाठी लावलेली आग पसरत जाऊन जंगलापर्यंत पोहोचते आणि वणवा भडकतो.
  • जंगलात फिरणारे गुराखी व तसेच पर्यटनासाठी आलेले पर्यटक व इतर लोक विडी, सिगारेट, आगकाडीचे थोटूक तसेच फेकतात. मध गोळा करणारे टेंभे घेऊन जातात आणि काम झाल्यावर तसेच फेकतात.
2. नैसर्गिक कारणे -
  • आकाशातून वीज सुक्या झाडावर किंवा गवतावर पडून वणवा लागतो.
  • विजेच्या तारा एकमेकांना चिकटून त्याच्या ठिणग्या गवतावर पडून वणवा पेटतो.
वणव्यामुळे होणारे नुकसान :

आज ग्लोबल वॉर्मिंगच्या भीषण संकटात वणव्यामुळे जंगले नष्ट होणे माणसाच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे. वणवा डोंगर व जंगल प्रदेश उजाड करतो. झाडांचा बळी घेतो. नवीन रोपे व बी नष्ट करतो. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी करतो. पाण्याचे प्रवाह कोरडे करतो. निसर्गाची व वन्यजीवांची अपरिमित हानी होते यात अनेक दुर्मिळ प्रजाती नष्ट होतात. ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. किंबहुना वणवा विझविण्यासाठी गेलेल्या व्यक्तींची जीवितहानी सुद्धा नोंदविण्यात आलेली आहे.

कित्येक बागायतदार मोठय़ा मेहनतीने खूप मोठाले खर्च करून आंबा, काजू, सीताफळ, साग, बांबू, इ. लागवड करतात. त्यात त्यांना यश येऊ लागले आहे असे वाटावे, तोपर्यंत वणव्यांनी त्या बागेचा कोळसा झालेला पाहण्याची वेळ अनेकांवर आली आहे.

दाहकता :

देशात सन २०१२ ते १ मे २०१६ या कालावधीत लागलेल्या वणव्यांची संख्या १०२५२७. गेल्या पाच वर्षांतील २०१२ हे साल सर्वाधिक वणव्यांचे होते. २०१६ त्याची बरोबरी करीत असल्याचे फॉरेस्ट सव्र्हे ऑफ इंडियाची आकडेवारी सांगते. महाराष्ट्र वनखात्याच्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षांतील राज्यांतील वणव्यांची संख्या १११० असून ६५३३ हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले आहे. या सगळ्याची आर्थिक नुकसानी रु ९० कोटीच्या जवळपास आहे.

वणवा रोखण्याची पारंपारिक पद्धत :

वणवे विझवण्यासाठी आज तरी दुसऱ्या झाडांचे टहाळ तोडून आग झोडपून काढणे हीच पद्धत प्रचलित आहे. खरतर याचा फारसा उपयोग होत नाही हे सर्वदूर काळे झालेले डोंगर पाहिल्यावर लक्षात येते. ही पद्धत वणवा विझवणाऱ्यासाठी सुद्धा धोकादायक आहे. पण वणवा पाहिल्यावर सद्प्रवृत्तीच्या व्यक्ती हा निष्फळ प्रयत्न करताना दिसतात.

वणवा रोखण्याची वनखात्याची पद्धत :

आगीचा इशारा देणारे वायरलेस सेन्सर्सचे जाळे उभारून कमी खर्चात आगीची माहिती मिळवली जाऊ शकते. तसेच उपग्रहामार्फत वणवा लागल्याबरोबर इशारा मिळण्याची यंत्रणा असू शकते. पण अशी यंत्रणा वनखात्यामार्फत वापरली जाताना आढळत नाही. आग लागू नये म्हणून पूर्वापार पद्धतीने ३ मी व ५ मी रुंदीच्या जाळरेषा प्रत्यक्ष तेथील गवत जाळून तयार केल्या जातात. तसेच आग लागल्यानंतर ब्लोअर या यंत्राचा वापर केला जातो. परंतु या पद्धती फारशा कामी येताना दिसत नाहीत.

वणवा रोखण्याची एस.व्ही.टी. पध्दत :

सगुणा वनसंवर्धन तंत्र (एस.व्ही.टी.) : डोंगरांवर वणवे लागण्यासाठी कारणीभूत असलेल्या गवताचे सेंद्रिय खतात व कर्बात रुपांतर करून नैसर्गिक गांडूळ निर्मितीला चालना देणारे पर्यायाने मातीची कणरचना सुधारणे, तिची धूप थांबवून पावसाचे पाणी जमिनीत झिरपण्याची सकारात्मक परिस्थिती निर्माण करणारे; डोंगरांवर पुनश्च वनअच्छादन होऊन माती-पाणी-जैवविविधता यांसारखे नैसर्गिक स्त्रोत उंचावणारे साधे सोपे तंत्र म्हणजे सगुणा वनसंवर्धन तंत्र होय.

सगुणा वनसंवर्धन तंत्र :

या तंत्राचे खालील विभाग पडतात :
  • पारंपारिक जाळरेषेला पर्याय "एस.व्ही.टी. लक्ष्मण जाळरेषा" डोंगर किंवा पडीक जागेवरील पावसाळ्यात वाढणारे गवत/तण ऑक्टोबर नंतर सुकते व नंतर अत्यंत ज्वालाग्राही बनते. सदर डोंगरावरच्या पूर्ण वेढ्याला तळापासून माथ्यापर्यंत टप्प्याटप्प्यांनी तणनाशकाचे पट्टे फवारावेत. अशी फवारणी करण्यासाठी तेथील गवत/तण रसरशीत हिरवे असावे व जमिनीला ओल असावी. तसेच काही ठराविक अंतरावर त्या आडव्या पट्ट्यांना जोडणारे उभे पट्टे सुद्धा फवारावेत. असे पट्टे गणपती अगोदर एकदा (अंदाजे ऑगस्ट तिसरा आठवडा) व दिवाळी अगोदर परत एकदा (अंदाजे ऑक्टोबर १ला-२रा आठवडा) फवारावे. यामुळे पावसाळ्यानंतर ज्वालाग्राही बनणारे गवत अगोदरच जागेवर कुजून गांडूळांचे खाद्य बनते व नंतर वणवा पेटायला कारणीभूत ठरणारे गवत संपून जाते.
  • सजीव कुंपण पट्टा ज्या वन जमिनींवर गुरे, बकऱ्या, वात्रट माणसे कुठूनही घुसखोरी करून आत जाऊ नये अशा ठिकाणी सजीव कुंपण पट्टा तयार करावा. त्यासाठी निवडुंग, घायपात, करवंद, शिंद अशा चिवट काटेरी वनस्पतींची निवड करावी आणि रस्त्याच्या बाजूच्या २० मी. जाळपट्ट्याच्या वरच्या बाजूला पावसाळा सुरु होताना एका ओळीत दाट लागवड करावी.
  • सजीव कँटूर पट्टा डोंगर उतारावरून पावसाचे पाणी वाहून जाताना मातीची खूप मोठ्या प्रमाणात धूप होते. तसेच अशाप्रकारे वाहून जाणाऱ्या माती व पाण्यामुळे नवीन झाडांची लागवड यशस्वी होऊ शकत नाही. अशी लागवड यशस्वी होण्यासाठी तेथे योग्य वातावरण निर्मितीची आवश्यकता आहे. हे काम सजीव कंटूर पट्टाच करू शकेल. या कामासाठी ओसाड डोंगर व माळराने येथे सहजगत्या जगतील व वाढतील अशा ६ चिवट झुडूपवर्गीय वनस्पतींच्या प्रजाती गेल्या काही वर्षांच्या संशोधनाअंती आम्ही निवडल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे; करवंद (Carissa congesta), रानकेळी (Enset superbum), वाळा/खस (Vetiver zizanoides), निर्गुडी (Vitex negundo), शिंदी (Phoenix sylvestris) व घायपात (Agave americana). यांची लागवड जूनच्या सुरुवातीला पावसाची सुरुवात झाल्यावर डोंगर उताराला आडवी व अंदाजे समपातळीवर (contour) पट्टा स्वरुपात करावी.
  • प्लास्टिक संरक्षण कव्हर (एस.व्ही.टी. स्लीव्ह) बोडके डोंगर व वने पुन्हा हिरवाईने झाकायचे असल्यास तेथील वनस्पतींची लागवड करताना फार बारकाईने व समग्र विचार करणे आवश्यक आहे. आमच्या मते प्रथमतः वर दिलेल्या ५ चिवट झुडूपवर्गीय वनस्पतींना मोठ्या प्रमाणात लावून किमान ३ वर्षे जगवणे आवश्यक आहे. त्यांच्या सुरुवातीच्या जगण्यासाठी मदतरूप म्हणून आम्ही एक ३ स्तरांचे प्लास्टिकचे वैशिष्ट्यपूर्ण संरक्षण कव्हर तयार करून घेतले आहे. त्या प्लास्टिकला मध्यभागी अतिनील (UV) किरण थांबविणारा पडदा असून बाहेरील दोन्ही बाजूला दवबिंदू जमा करून ते थेंब घरंगळणारे पडदे आहेत. या प्लास्टिकचा पडदा/कव्हर रोपट्याभोवती बसविल्यास रात्री जमा होणाऱ्या दवबिंदूपासून रोपट्याला थोडेसे पाणी मिळणे, अतिनील किरणांपासून संरक्षण व भटक्या - जंगली जनावरांपासून संरक्षण मिळते. त्यामुळे ओसाड डोंगराळ भागात लागवड केलेल्या रोपट्यांच्या जगण्याचे प्रमाण वाढविणे सोपे होते.
सगुणा वनसंवर्धन तंत्राचे फायदे :
  • डोंगरांवर वणवे थांबविण्यासाठी अत्यंत कमी खर्चाचा, कमी मनुष्यबळाचा, सुलभतेचा व शाश्वती असलेला मार्ग.
  • जंगले व डोंगरावरील निसर्गत: वाढणारा लाखो टन सेंद्रिय जैवभार (Biomass) जळून जाण्याऐवजी त्याचे उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत त्याच जागी (In-Situ) तयार होऊन जिरवणे शक्य होईल. त्यायोगे जागतिक पर्यावरणाशी संबंधित मोठ्या प्रमाणावर "कर्बाचे स्थिरीकरण" (Carbon Sequestration) शक्य होईल.
  • वणव्यामध्ये होरपळून मरणारी पक्ष्यांची पिल्ले, सरपटणारे प्राणी इ. जैवविविधता वाचविणे शक्य होईल. वणव्याच्या तापमानामुळे जी सूक्ष्म जैवविविधता नष्ट होते ती सुद्धा वाचविणे शक्य होईल.
  • वणवा विझवायला जाणाऱ्या वनमजूर व स्वयंसेवकांच्या जीविताला निर्माण होणारा धोका प्रभावीपणे व निश्चित टाळणे शक्य होईल.
  • या तंत्रामुळे पडजमिनीवरील नैसर्गिक गांडूळांची संख्या भराभर वाढते; मातीची कणरचना सुधारल्यामुळे मातीची धूप थांबून, सदर जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपणे शक्य होईल त्यामुळे डोंगर व जंगले पाण्याच्या मोठ्या साठ्याने समृद्ध होतील. तसेच डोंगरावरून वाहून येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे निर्माण होणारी पूरस्थिती टळू शकेल.
  • या सर्वांमुळे डोंगर व जंगली भागातील बोडकी जमीन पुन्हा नव्याने श्वसन करू लागेल व त्यामुळे उघड्या-बोडक्या डोंगरांवर पुन्हा हिरवाई आणून तेथे प्रसन्नता व उत्पादकता निर्माण करणे शक्य होईल.
  • बोडके डोंगर झाडोऱ्यानी भरल्यानंतर वादळी वाऱ्याचा बिमोड करणे तसेच कोरड्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी जमिनीची धूप थांबू शकेल.


  श्री अनिल निवळकर